पुणे विमानतळावरील सर्वेक्षणात आणखी दोन प्रवाशांना करोना संसर्ग; रुग्णांची संख्या सहावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ जानेवारी २०२३ । परदेशांतून राज्यातील विविध विमानतळांवर दाखल झालेल्या प्रवाशांपैकी पुणे आणि मुंबईतील आणखी दोन प्रवाशांना करोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे. या सहा रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण अहवाल प्रतीक्षेत आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आलेल्या प्रवाशांना हा संसर्ग झाला असून त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण अहवालांची प्रतीक्षा आहे.

परदेशात वाढत असलेल्या बीएफ.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरपासून राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर एक लाख १६ हजार ६६६ प्रवासी आले असून, त्यांपैकी २३७३ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीतून करोना संसर्गाचे निदान झालेल्या प्रवाशांची संख्या सहावर पोहोचली असून त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. यांपैकी तीन प्रवासी पुणे येथील, दोन नवी मुंबई येथील आणि एक प्रवासी गोवा येथील आहेत. जनुकीय क्रमनिर्धारण अहवालानंतर त्यांना झालेला संसर्ग कोणत्या विषाणू प्रकाराचा आहे, हे स्पष्ट होणार आहे.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १६४ एवढी आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात आलेल्या प्रवाशांना असलेला संसर्ग कोणत्या विषाणू प्रकारामुळे झाला आहे, हे जनुकीय क्रमनिर्धारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *