महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ जानेवारी । नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढले. त्यामुळे नजीकच्या काळात हॉटेल, रेस्टॉरंटपासून ढाब्यावर किंवा गाडीवरील पदार्थ महाग होऊ शकतात.
१९ किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी ही वाढ लागू आहे. घरगुती गॅसच्या दरात सरकारने वाढ केलेली नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) याआधी ६ जुलै २०२२ रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ केली होती.
सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर १०५३.५ रुपये आहे. मात्र व्यावसायिक सिलिंडरचे दर मागील वर्षात चार वेळा वाढले आहेत. मार्च २०२२ मध्ये प्रथम ५० रुपयांनी, नंतर ५० रुपयांनी, मे महिन्यात साडेतीन रुपयांनी व जुलैमध्ये ५० रुपयांनी वाढ झाली होती.
चार महानगरांतील दर असे ः दिल्ली – १०५३ रुपये, मुंबई – १०५२.५, कोलकता – १०७९, चेन्नई – १०६८.५० दरम्यान, व्यावसायिक गॅसच्या दरवाढीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘ही या सरकारची लोकांना “नवीन वर्षाची भेट” आहे आणि “ही फक्त सुरवात आहे” असा उपरोधिक टोला देणारे हिंदीतील ट्विट करण्यात आले.