महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असतानाच केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह हिंदुस्थानात अनेक ठिकाणी गणेशोत्सव आणि नवरोत्रोत्सवासह मूर्ती पूजा केले जाणारे उत्सव साजरा केले जातात. या उत्सावादरम्यान, मोठ्या प्रमाणात पीओेपीच्या मूर्तींचा सर्रास वापर केला जातो.केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने (सीपीसीबी) देशभरातील उत्सवासाठी लागणाऱ्या मूर्तींची नियमावली (गाईडलाईन्स) जाहीर करताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या, मातींच्या, नैसर्गिक आणि बायो डिग्रेडेबल साहित्य वापरून मूर्तींची निर्मिती करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्याशिवाय मोठ्या आणि उंच मूर्तीवर देखील बंधने आणताना मंडळांनी लहान मूर्तीचा वापर करण्याची सूचना केली आहे. याबरोबरच देखाव्यासाठी प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. सीपीसीबीने यावेळी मूर्तिकारांसाठी नियमावली जाहीर करताना सार्वजनिक मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मूर्ती विसर्जनासाठी मंडळे आणि घरगुती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठीदेखील नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे या निर्णयाचे स्वागत केले असले तरी यंदाच्या वर्षातून या नियमावलीतून सुटका व्हावी, यासाठी राज्य सरकारकडे धाव घेतली आहे.
यावेळी सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली जाहीर करताना सीपीसीबीने लहान आणि इको फ्रेंडली मूर्ती घेण्याची सूचना केली आहे. मंडळांनी शक्य तितक्या कमी उंचीची आणि मातीची मूर्ती, किंवा मका, पालक, गहू आदी पर्यावरणास अनुकूल खाद्यपदार्थांनी भरलेल्या मूर्ती स्थापित कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळांनी मूर्तीचे विसर्जन करताना पूजेसाठी चढविण्यात आलेले हार, फुले यांच्यासह डेकोरेशनचे साहित्य काढण्याची सूचना केली आहे. देखावा करताना जास्तीत जास्त इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेणे गरजेचे असल्याचे यात नमूद केले आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीदेखील नियमावली यावेळी जाहीर केली आहे. यामध्ये जे मुर्तिकार मूर्ती तयार करण्यासाठी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करीत आहेत, त्यांनाच परवानगी देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय सार्वजनिक मंडळांना आणि घरगुती उत्सव साजरा करणाऱ्यांना मूर्तींचे विसर्जन करताना कृत्रिम तलावाचा अधिकाअधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.
कचरा निर्मूलनासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचनेसह एकूण २४ हून अधिक सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी करण्यात आल्या आहेत. समुद्रात विसर्जन करणाऱ्या मूर्तींसाठी देखील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. समुद्रात विसर्जन करत असताना फक्त लो टाईडवेळीच विसर्जनासाठी परवानगी देणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. याठिकाणी विसर्जन करताना राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थानी आवश्यक त्या सर्व उपायोजना राबविण्याची सूचना केली आहे. याबरोबरच राज्य सरकारला आणि स्थानिक प्रदूषण नियामक मंडळाच्या मदतीने उत्सव कालावधीत आणि त्यानंतर पाण्याची चाचणी करण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली आहे. तीन टप्यात ही चाचणी करायची आहे.