राणेंनी माझ्या नादाला लागू नये : राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । मी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा मार्ग मोकळा करत आहे, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. मी नारायण राणे यांची सगळी आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते ५० वर्षे तुरुंगातून सुटणार नाहीत, असे राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी आक्रमक शैलीत नारायण राणे यांच्यावर टीका केली.

नारायण राणे म्हणतात की, मी राऊतांचा तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करत आहे. मला पुन्हा तुरुंगात जावे लागले तर मी तयार आहे. मी ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणार नाही. धाडसाच्या गोष्टी कोण करत आहे? मी अजूनपर्यंत नारायण राणे यांच्यावर काहीच बोललो नाही. ते आमचे सहकारी होते. नारायण राणे यांनी मला तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देऊ नयेत. त्यांना धमक्या द्यायच्या असतील तर राजवस्त्र बाजूला ठेवून या, मग मी दाखवतो. राणेंनी माझ्या नादाला लागू नये. मी ईडीने चौकशीसाठी बोलवल्यावर शरणागती पत्कारणारा नेता नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

जे जे नेते मला तुरुंगात धाडण्याची भाषा करत आहेत, त्यांच्या वक्तव्यांची नोंद मी करत आहे. मी या सगळ्यांच्या वक्तव्यांची नोंद सरन्यायाधीशांकडे पाठवणार आहे. नारायण राणे यांची सगळी आर्थिक प्रकरणं बाहेर आली तर ते ५० वर्षे सुटणार नाहीत, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी होणार आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होऊ शकते. तेव्हा न्यायालय संजय राऊतांच्या जामीनाबाबत काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांनी कणकवली पर्यटन महोत्सवात बोलताना संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मी वाचून विसरणारा व्यक्ती नाही, दखल घेणारा आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते, हा माझा वाईट स्वभाव आहे. संजय राऊतांनी लिहलेला २६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले , ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *