चित्रा वाघ यांना नोटीस, चाकणकर म्हणाल्या- कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतल्याचेही चाकणकर यांनी म्हटले.

1993 कलम 92 (2) (3) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असेही चाकणकर यांनी म्हटले. राज्यात उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना लक्ष्य केले होते. चित्रा वाघांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.

कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो. तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही. तर दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती, असेही चाकणकर यांनी सांगितले. महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली होती, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता.

कुणा काय घालावे, हा ज्याचा त्याचा अधिकार

कुणी काय कपडे परिधान करावेत, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही, अशी भूमिका आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. तसेच गृहविभाग भाजपकडे आहे. तरीही चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या बालिशपणाला दाद दिली नाही, असे चाकणकर म्हणाल्या.

उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून नेत्या चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना लक्ष्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी महिला नेत्या आमने-सामने आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *