महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं संजय राऊतांविरोधात बाजवलेलं अजामीनपात्र वॉरंट राऊतांनी तातडीनं दुपारीच कोक्टापुढे हजेरी लावत रद्द करून घेतलं आहे. अब्रुनुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्यानं अखेर न्यायालयानं तक्रारदाराच्या विनंतीवरून ही कारवाई केली होती. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याविरोधात राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी शिवडी कोर्टात सुरू आहे. राऊतांनी केलेले 100 कोटींच्या कथित शौचालय घोटाळ्यातील आरोप हे बिनबुडाचे आणि बदनामीकारक असल्यानं आपली प्रचंड मानहानी झाल्याची तक्रार मेधा सोमय्या यांनी कोर्टात केली आहे.
किरीट आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावरील शुक्रवारच्या सुनावणी दरम्यान संजय राऊत वारंवार अनुपस्थित राहिल्यानं दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. या सुनावणीत न्यायालयानं मेधा सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि खटल्याची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी निश्चित केली आहे.