डब्ल्यूएचओ कडून धोक्याचा इशारा; ‘चला बसूया’ म्हणणाऱ्यांचं टेन्शन वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ जानेवारी । मद्यसेवनाबद्दल अनेक वर्षांपासून विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. मद्य सेवनाविषयी अनेक दावे केले जातात. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दारूबद्दल चकित करणारा दावा केला आहे. दारूचा पहिला थेंब पोटात गेल्यापासूनच कर्करोगाचा धोका वाढतो, असा दावा डब्ल्यूएचओनं केला आहे.

थोडीच घेतो रे, फार नाही घेत, चढेपर्यंत पित नाही, असे म्हणत अनेकजण दारू पिण्याचं समर्थन करतात. जास्त नाही घ्यायची, रोज आपली थोडी थोडी असं म्हणत दररोज बसणारे काही कमी नाहीत. जास्त प्यायली तरच त्रास होतो असा तर्क सांगत अनेकजण रोज बसतात. मात्र डब्ल्यूएचओनं दिलेली माहिती या मंडळींचे डोळे उघडणारी आहे. इतकी प्यायलात तर दारू हानीकारक नाही, असं कोणतंच प्रमाण नाही, असं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे.

डब्ल्यूएचओनं द लॅन्सेट पब्लिक हेल्थमध्ये महत्त्वाची माहिती प्रकाशित केली. आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही, असं दारूचं कोणतंच प्रमाण नाही, असं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे. दारूच्या सुरक्षित प्रमाणाबद्दल कोणताच दावा केला जाऊ शकत नाही, अशी माहिती डब्ल्यूएचओच्या क्षेत्रीय सल्लागार डॉ. कॅरिना फेरेरा-बोर्गेस यांनी दिली.

दारूच्या सेवनामुळे किमान ७ प्रकारच्या कर्करोगांचा धोका असतो. यामध्ये तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, पोटाचा कर्करोग यांचा समावेश आहे. दारू म्हणजे सामान्य पेय नाही, तर त्यामुळे शरीराचं मोठं नुकसान होतं. दारू एक विषारी पदार्थ आहे, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.

इथेनॉल (अल्कोहोल) जैविक तंत्राच्या माध्यमातून कर्करोगाचं कारण ठरतं, असा दावा डब्ल्यूएचओनं अभ्यासातून केला आहे. दारू कितीही महाग असो अथवा कितीही कमी प्रमाणात घेतलेली असो, तिच्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. दारूचं प्रमाण अधिक असल्यास कर्करोगाचा धोका वाढतो, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे.

युरोपियन देशांमध्ये कर्करोगाचं प्रमुख कारण केवळ दारूच आहे. कमी प्रमाणात दारूचं सेवन करणाऱ्यांचादेखील यामध्ये समावेश आहे. मद्य सेवन करणाऱ्या महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. याला केवळ मद्यपान हेच कारण आहे. युरोपियन युनियनमध्ये मृत्यूचं प्रमुख कारण कर्करोग आहे. युरोपियन देशांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *