महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे 3 वाजेपासूनच गर्दी केली. त्यामुळे मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची लांब रांग लागली होती. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
आज पहाटे चार ते सहा या वेळेत पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा बाप्पाच्या चरणी सादर केली. त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर, तनवी अभ्यंकर यांनी गायन केले. तर केदार परांजपे, निलेश देशपांडे,अपूर्व द्रविड आणि विशाल गंड्रतवार यांनी साथ संगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.
संकष्ट चतुर्थी एक वर्त
संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणीही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.
मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
दगडूशेठ हलवाई गणपतीचे ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी म्हणाले, वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे.
मंदिर परिसरातील वाहतूक वळवली
दरम्यान, अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचे गृहीत धरून पोलिसांच्या वाहतूक विभागाने परिसरातील वाहतूक मंगळवारी पर्यायी मार्गाने वळवत या भागात वाहतूक बंद ठेवलेली आहे.