महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ जानेवारी । केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांना कुप्रसिद्ध गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या नावाने शनिवारी धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली. कॉलरने 100 कोटींची खंडणीची मागणी करत तेवढी रक्कम न दिल्यास गडकरी यांना जिवानीशी मारण्यात येईल असे धमकावले. या नंतर गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
या फोनचा मागोवा घेताना पोलिसांना हे तीन कॉल कर्नाटकातल्या हुबळी येथून आल्याची महिती मिळाली. कर्नाटकमधील एका तुरुंगातून ही धमकी आली होती. ही धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव जयेश कांता असं असून तो कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
नागपूरच्या सावरकर चौकात ऑरेंज सिटी हॉस्पिटलसमोर नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शनिवारी सकाळी कार्यालयीन कर्मचारी व गडकरी यांचे कार्यकर्ते उपस्थित असताना 11.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालयात धमकीचा फोन खणाणला. समोरच्याने बोलताना तो दाऊद इब्राहिम याच्याकडून बोलत असल्याचे सांगत 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास गडकरी यांना जिवानीशी मारण्यात येईल असे धमकावण्यात आले. त्यानंतर लगेचच दुसरा तर 12 वाजता धमकीचा तिसरा कॉल आला. दाऊद इब्राहिमच्या नावे खंडणीसाठी धमकीचे कॉल आल्याने कार्यालयात एकच घबराट झाली.
एकूण तीन निनावी फोन कॉल्सनंतर गडकरी यांचे निवासस्थान तसेच कार्यालयावरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत कॉल ट्रेस केला होता. हा फोन कॉल बेळगामधून आला होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथकही कर्नाटकमध्ये रवाना झाले होते.