पिंपरी चिंचवड : ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात महापालिका शाळांकडून यू-ट्यूब चॅनल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ जानेवारी । ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभागाही मागे नाही. शिक्षण विभागाच्या वतीने यू-ट्यूब या माध्यमाचा वापर करून गेल्या चार महिन्यांपासून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुमारे 110 अभ्यासपूर्ण व्हिडीओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओंना विद्यार्थी तसेच पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी यू-ट्यूबचा वापर होत आहे. हाच विचार करून काळासोबत चालण्याच्या विचाराने पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाच्यावतीने यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून शिक्षण विभागाचे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. अभ्यासपूर्ण व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते. तसेच, नावीन्यपूर्ण शालेय व्हिडीओ सर्वांना पाहता येत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांसह पालकांना होत आहे.

महापालिकेच्या शाळा सकारात्मकरित्या बदलत आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये होणारे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलचा फायदा होत आहे. शाळेत होणारे उपक्रम, शाळेची शिक्षणपद्धती या माध्यमातून नागरिकांना समजत आहेत. शाळेत प्रयोगशील शिक्षक आहेत. एखादे विषय शिकवण्याची पद्धती, विषयाचे कंगोरे यामाधून दाखवले जात आहेत. हिंदी तसेच मराठी कविता, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यानुभव, अभ्यासविषयक व्हिडीओ यांचा यात समावेश आहे. उपक्रमशील शिक्षक कोणता विषय कसा शिकवतात हेदेखील पाहून पालकांना मुलांचा अभ्यास घेताना त्याचा फायदा होत आहे.

खासगी शाळांपेक्षा महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे पालकांना परवडणारे असते. महापालिकेच्या शाळा खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण आणि उपक्रम घेत आहेत. त्यामुळे महापालिका शाळांकडे ओढा वाढला आहे. महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांचे आदर्श पाठाचे व्हिडीओ, विद्यार्थ्यांचे विविधगुणदर्शन व्हिडीओ या माध्यमातून समोर येत आहेत. तसेच, शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेतात त्यांची माहिती शहर आणि शहराबाहेरच्या नागरिकांपर्यंत पोहोचायला मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *