महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ जानेवारी । लग्नसराईमुळेसोनं खरेदी वाढली आहे. जानेवारी ते जून महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने सोन्याची मागणी जास्त असते. अशा परिस्थितीमध्ये यंदा मात्र सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. नोटबंदी आणि कोरोना काळातही सोन्याचे दर एवढे वधारले नव्हते. तेव्हाचा रेकॉर्डही आज सोन्याने मोडला आहे. सोन्याची किंमत पाहूनच आज घाम फुटेल. सोन्याच्या दराने आज आणखी एक नवा रेकॉर्ड केला आहे.
वायदा बाजारात आज सोन्याचे दर 56,541 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी १६ जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.31 टक्क्यांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात आज 0.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
GST आणि RTGS च्या किंमती पकडून 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 57,800 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता टेन्शन वाढलं आहे. दागिन्यांवर GST लागून सोन्याच्या किंमती आणखी वाढल्या आहेत.
वायदा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 173 रुपयांनी वधारुन 56 हजार 494 रुपये झाले आहेत. तर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती वाढल्याने 22 आणि 18 कॅरेटचेही दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे.
चांदीच्या दरातही 496 रुपयांनी वाढ झाली असून दर 69,923 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचा व्यापार आज 69,500 रुपयांवर सुरू झाला होता. आता 70 हजारच्या जवळपास चांदीचे दर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे दर आज वधारल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याचा भाव 0.27 टक्क्यांनी वाढून 1,925.65 डॉलर प्रति औंस झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 0.79 टक्क्यांनी वाढून 24.46 डॉलर प्रति औंस झाला. गेल्या 30 दिवसांत सोन्याच्या दरात 7.45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या काळात चांदीच्या दरात 5.57 टक्क्यांची वाढ झाली आहे.