महाराष्ट्र २४- ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी – पणजी – ओमप्रकाश भांगे – पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही वाढत असल्याचे आकडे पुढे येत असून, शुक्रवारी दिवसभरात तब्बल 144 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजे, 1 हजार 630 रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात 106 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर; पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने पावणेदोनशे रुग्णांचे बळी घेतले.
दरम्यान, विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेले 132 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 33 जण व्हेंटिलेटरवर असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तपासणीचा वेग वाढवून रोज किमान दीड हजार नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. याआधी ही संख्या साडेसहा ते सातशेपर्यंत होती. मात्र, आता “स्वॅब’ घेण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढल्याने रुग्ण संख्येत भर पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 1 हजार 652 जणाची शुक्रवारी दिवसभरात तपासणी झाली असून, त्यातील 106 नागरिकांना कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे.
शहरात नऊ मार्चपासून आजपर्यंत 3 हजार 93 नागरिकांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील 1 हजार 630 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत सध्या 1 हजार 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या अजूनही काही प्रमाणात मृत्यू होत आहेत. ते रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.