महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी ।
‘बाळासाहेबांचा एवढा अपमान कुणी केला नसेल’
संजय राऊत काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावरून दीपक केसरकरांनी टीकास्र सोडलं आहे. “हिंदुस्थानवर जो प्रेम करतो, तो हिंदू आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांना जी काँग्रेस विरोध करत होती, त्यांना काश्मीरमध्ये जाऊन भेटणं एवढा मोठा अपमान बाळासाहेब ठाकरेंचा कुणीही केला नाही तो संजय राऊतांनी केला असं मला वाटतं. त्यामुळेच जे लोक सत्तेसाठी काँग्रेसचे पाय धरतात, राष्ट्रवादीच्या मागे मागे धावतात, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही”, असं दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री रात्री २ वाजेपर्यंत काम करतात असं सांगताना केसरकरांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. “जे लोक झोपतात, ते स्वप्न बघतात. जे लोक काम करतात ते दिवसरात्र धावत राहतात. म्हणून आमचे मुख्यमंत्री झोपत नाहीत. रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत काम करतात. आम्ही सकाळी ११-१२ वाजता कार्यक्रम करणारे लोक नाहीत. आम्ही जनतेतले लोक आहोत. जनतेची सेवा करणारे लोक आहोत. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“एकनाथ शिंदेंचा अपमान झाला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंनी विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवंय का? तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं की आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा रीतीने केली जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं, याचा खुलासा येत्या दोन-चार दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे”, असा इशारा दीपक केसरकरांनी यावेळी बोलताना दिला.