महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद सध्या सुप्रीम कोर्टात आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सध्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी आहे. यावर आता शिंदे गटासह विरोधी पक्षातील नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या 14 तारखेला कोसळणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. पुढील सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या बाजुने निकाल लागले असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हटलं पटोले यांनी?
महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या 14 तारखेला कोसळणार असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल आहे. येत्या 14 तारखेला होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये शिवसेनेच्या बाजूने निर्णय लागणार आहे, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. शेड्यूल 10 च्या तरतुदीनुसार हे सरकार लवकरच कोसळेल. महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका लागू शकतात. 2024 ची वाट बघू नका, असं नाना पटोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितलं.
दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तेत असलेलं सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ वाशिम इथं आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.