महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आज दिवसभर सर्वत्र भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. विशेष करून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या दोन्ही पक्षांकडून आज दिवसभरात विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे.
आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्मृतीस्थळावर शिवसैनिक तसंच लोकप्रतिनिधी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्याच बरोबर कुलाबा रिगल सिनेमा सर्कल येथील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी कुटुंबासह येणार आहेत.
तसंच याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ‘बाळासाहेबांच्या लेकी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रमुख नेते त्यांच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागलंय.