पुण्यात गणेश जयंतीनिमित्त शहरातील मंदिरे विद्युत रोषणाईने झगमगली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । विद्युत रोषणाईने झगमगलेली मंदिरे… उत्सवमंडपात केलेली खास सजावट…. गणेश मंडळांच्या ठिकाणीही सुरू असलेले सजावटीचे काम अन् धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनात व्यग्र असलेले गणेश मंडळांचे कार्यकर्ते… असे वातावरण सध्या श्री गणेश जयंतीनिमित्त शहरभर आहे. बुधवारी (दि. 25) श्री गणेश जयंती असल्याने मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली असून,विद्युतरोषणाई, उत्सवमंडपाची उभारणी, फुलांच्या सजावटीचे कामही पूर्णत्वास आले आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाचे फलक मंदिरांच्या ठिकाणी पाहायला मिळत असून, ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर आदी मंदिरे विद्युतरोषणाईने झगमगली आहेत.

श्री गणेश जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये खास नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्याची तयारीही पूर्ण झाली आहे. शहरातील मंदिरांत उत्सवाचा रंग पाहायला मिळत असून, उत्सवमंडपासह सजावटीचे कामही पूर्णत्वास आले आहे. काही मंदिरांमध्ये गणेश जयंती उत्सवाला सुरुवातही झाली असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. सनई-चौघडा वादनासह भजन-कीर्तन, अथर्वशीर्षपठण, भक्तिसंगीत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होत आहेत.

मंडळांनीही श्री गणेश जयंतीसाठी खास तयारी केली असून, सामाजिक उपक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री गणेश जयंतीनिमित्त खरेदीसाठीही बाजारपेठेत लगबग पाहायला मिळत असून, पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी लोकांनी रविवारी मंडई, रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आदी ठिकाणी गर्दी केली. खरेदीसाठी आलेल्या लोकांनी मंदिरांत जाऊन गणरायाचे दर्शनही घेतले. सायंकाळी चारनंतर खरेदीसाठी गर्दी झाली होती.

मंदिरात 26 तारखेपर्यंत माघी गणेश जन्मोत्सव आयोजित केला आहे. त्यात विविध कार्यक्रम होत असून, 23 जानेवारीला सनई-चौघडा वादन, अथर्वशीर्षपठण, गायनसंध्या, भक्तिसंगीताचे आयोजन केले आहे. 24 जानेवारीला सनई-चौघडा वादन, अथर्वशीर्षपठण आणि भक्तिसंगीताचे कार्यक्रम होतील. 25 जानेवारीला श्री गणेश जयंतीच्या दिवशी सनई-चौघडा वादन, गणरायास अभिषेक आणि गणेशयाग, गणरायाची जन्म आरती, नारदीय कीर्तन, शेजारती आणि छबिना, असे कार्यक्रम होतील. 26 जानेवारीला सनई-चौघडा वादन, अथर्वशीर्षपठण, शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन मैफल, भक्तिसंगीत, भावगीत आणि नाट्य गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांना दिवसभर गणरायाचे दर्शन घेता येणार आहे, असे ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थानच्या विश्वस्त संगीता ठकार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *