पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन महाबळेश्वरचा पारा 4 अंशांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । ‘थंडीचा बालेकिल्ला’ अशी ओळख असणार्‍या महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून रविवारी शहरात लिंगमळा परिसरात पारा 4 अंशांवर घसरला होता. पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन यावर्षी चांगलेच गारठले असून थंडीतही पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

महाबळेश्वर येथील वातावरण निसर्गरम्य पर्यटनस्थळाची नजाकत दाखवून देत असून या थंडीस जोरदार वार्‍याची साथ मिळाल्याने वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील पारा घसरत चालला आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे पर्यटकांच्या हक्काचे डेस्टिनेशन महाबळेश्वरला गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टिसौंदर्य पर्यटक व स्थानिकांना पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याने येथील प्रसिद्ध वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.

महाबळेश्वरपासून काही कि.मी. अंतर खाली गेल्यास काही भागांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी असते. मात्र, येथे गुलाबी थंडीची नजाकत अनुभवताना पर्यटक दिसतात. वेण्णा लेक तसेच परिसरात सकाळच्या प्रहरी धुके दिसत असून त्यातून निसर्गाचे विलोभनीय द़ृश्य पाहावयास मिळत आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. मुख्य बाजारपेठेत फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करूनच फेरफटका मारताना दिसून येत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे स्वेटर, शाल, ब्लँकेटस् खरेदी करण्याकडेदेखील पर्यटकांचा कल दिसतो. गरमागरम मका कणीस, पॅटीस,भजी, चहाचा आस्वाद घेताना असंख्य पर्यटक दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *