महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । आज 23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्ताने विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्याचप्रमाणे पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा देखील आज पहिल्यांदाच सामना होऊ शकतो. त्यामुळे आज या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तैलचित्राचे अनावरण
आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. आम्हीच खरी शिवसेना आहोत असेही शिंदे गटाने म्हणायला सुरु केले. शिंदे आणि ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे त्यांच्यातील दरी दिंवसेंदिवस वाढतच गेली.
एकत्र येणार का?
नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे हे तीन नेते अजूनपर्यंत समोरासमोर आलेले नाहीत. आज विधान भवनात बसवण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभात तिघे सोबत येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असेल.
ठाकरे संध्याकाळी षण्मुखानंदमध्ये
सकाळी उद्धव ठाकरे रिगल सिनेमासमोरील शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर ते दादरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी दादरच्या आंबेडकर भवनात येऊन प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील. नंतर उद्धव ठाकरे हे संध्याकाळी षण्मुखानंद येथे होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत. त्यामुळे विधान भवनातील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.