महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । महिला सक्षमीकरण व नवोदितांना संधी देण्यासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सव आयोजित केला आहे. त्याचा प्रारंभ बुधवारी (ता. २५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने २९ जानेवारीपर्यंत ‘इंद्रायणी थडी’ महोत्सव आयोजित केला आहे. त्याच्या उद्घाटनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तब्बल १७ एकर जागेत भरवलेल्या महोत्सवात एक हजार पेक्षा अधिक स्टॉल, ८०० पेक्षा जास्त महिला बचत गटांचा सहभाग, ग्राम संस्कृती, बारा बलुतेदार व्यवस्था, ५०० पेक्षा अधिक स्टॉलमध्ये खाद्यमहोत्सव, मोफत बालजत्रा, भजन महोत्सव आदी कार्यक्रम होतील, असे आमदार लांडगे यांनी कळविले आहे.