उद्योग क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी ; मराठी तरुणांनी फायदा घ्यावा ; उद्योगमंत्री सुभाष देसाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे -करोना संकटामुळे उद्योग क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी केले.ऑल इंडिया सारस्वत कल्चरल संघटनेच्या वतीने आयोजित ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील वेबिनारमध्ये देसाई बोलत होते मराठी तरुणांच्या पाठीमागे महाविकास आघाडीचे सरकार उभे आहे. मराठमोळ्या हिंमतीमुळेच करोनाच्या संकटावर मात करून आपण पुढे जाऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजित गुंजीकर, किशोर मासूरकर, नरेंद्र वझे, स्मिती गवाणकर आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘सध्या करोनामुळे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज आहे. संकटासोबत संधी मिळते हे हेरून उद्योग विभागाने विविध धोरणे, योजना आखल्या आहेत. त्याचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा.’ महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करण्याचे आवाहन देखील उद्योगमंत्र्यांनी केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात ७० हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ५० हजार उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. हे करताना प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लोकांच्या जीवनाला व आरोग्याला अधिक प्राधान्य दिले असल्याने उद्योगांत काम करणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत.

करोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी भूखंड, रस्ते आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एमआयडीसीने या आणि उद्योग सुरू करा, ही संकल्पना राबविण्यासाठी नवीन उद्योगांसाठी शेड तयार करण्याचाही निर्णय़ घेतला आहे. गुंतवणूकदार यंत्र-सामग्री आणून थेट उत्पादन सुरू करू शकतील. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना पद्धत सुरू केली आहे. शिवाय मोठ्या गुंतवणूकदारांसाठी उद्योगमित्र संकल्पना हाती घेतली आहे. उद्योग विभागाचा एक अधिकारी त्या गुंतवणूकदारांसोबत पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू होईपर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे. आता गुंतवणूकदारांनी पुढे यावे आणि उद्योग सुरू करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले.

उद्योगांत कामगारांची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी ‘कामगार विनिमय ब्यूरो’ स्थापन केला जाणार आहे. यावर लवकरच बैठक होईल. कामगारांची नोंदणी करून गरजेनुसार उद्योगांना कामगारांचा पुरवठा केला जाईल. यावेळी अल्पकालिन प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात येईल. महाराष्ट्रात कामगारांची टंचाई भासणार नाही, याची शासन काळजी घेत आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्र व कामगारांना सरकार मदत करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये उद्योगांसाठी अनेक सवलतींचा वर्षाव केलेला आहे. सेवा, उत्पादन क्षेत्राला दिलासा आहे. सोबत पर्यटन, वाहतूक आदी उद्योग क्षेत्रांसाठी मोठी संधी आहे. याचा बारकाईने अभ्यास केल्यास त्याचे लाभ समजू शकतात. त्यामुळे या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

करोना संकटकाळात औषध निर्माण क्षेत्राने मोठे काम केले आहे. आरोग्याशी निगडीत गोष्टी पुरवण्याकामी या क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे. या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी फार्मा धोरण तयार केले जाणार आहे. लवकरच यासाठी बैठक घेतली जाईल. यामध्ये फार्मा क्षेत्रातील उद्योजक, सीईओंना निमंत्रित केले जाईल. याशिवाय एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलचे प्रतिनिधी असतील. या बैठकीतील चर्चेनंतर फार्मा क्षेत्रासाठी चांगले धोरण तयार केले जाईल.

उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावे. मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक झालेली आहे. करोनामुळे या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी सरकारने उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणूकदारांनी राज्य सरकारचे धोरण समजून घ्यावे. बाहेर जिल्ह्यात आपले प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री देसाई यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *