महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ जानेवारी । अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी हीच शिकवण दिली आहे. ही शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. विकाऊ होते ते विकले गेले. काय भाव ते तुम्हाला माहित आहे. असं उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हणतात उपस्थितांनी ५० खोके एकदम ओके या घोषणा दिल्या. त्यानंतर ही घोषणा राहुल गांधींपर्यंत जम्मूलाही पोहचली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरात उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी छोटेखानी भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला आहे. तसंच महाराष्ट्रात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. ही घटना महत्त्वाची मानली जाते आहे. आनंद आश्रम या ठिकाणी ते गेलेले नाहीत. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरु मानतात. अशात याच ठाण्यात जाऊन उद्ध ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि हार घातला. आज उद्धव ठाकरेंच्या सोबत राजन विचारे तर होतेच पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही आहेत.