पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत अवकाळी ; शेतकऱ्यांना बसणार फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी (cold wave) पडली आहे. वातावरणातील या बदलानंतर (Change Weather) गुरुवारी व शुक्रवारी राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला.काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस (Rain) झाला. अवकाळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने मात्र बळीराजाची चिंता वाढलीय. या अवकाळी पावसाने पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच पिकांना फटकाही बसणार आहे. उत्पादनात घट होणार आहे.

अवकाळीमुळे कांदा, हरभरा, मका, गहू पिकांवर परिणाम होणार आहे. धुके आणि अवकाळीमुळे गहू पिकावर तांबेरा रोग पडण्याची भीती आहे तर हरभरा पिकावर घाट आळी येण्याची शक्यता असते. कांदा आणि मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू शकतो.

कडाक्याची पडलेली थंडी अन् त्यानंतर येणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग धास्तावला आहे, विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा गहू व हरभरा पिकांचे नुकसान होणार आहे. पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी त्याद्दष्टिने नियोजन करण्याची गरज आहे. अचानक हा बदल नेमका कशामुळे झाला असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाचा अंदाज
थंडीचा अनुभव मुंबईकरांसह राज्याने घेतला. नाशिक व खान्देशात हाडे गोठवणारी थंडी देखील अनुभवयाला मिळाली. आता गेल्या दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. २७ व २८ जानेवारी रोजी राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD)व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *