महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बीचिंग – विशेष प्रतिनिधी – कोरोनाचे विषाणू नष्ट केल्याची कबुली अखेर चीनने दिली आहे. देशातील अनधिकृत प्रयोगशाळेतील कोरोनाचे सर्व नमुने नष्ट करण्याचे आदेश चीनच्या प्रशासनाने दिल्याची माहिती समोर येत आहे. जैविक सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची मखलाशी त्यांच्याकडून केली जात आहे. विशेष म्हणजे चीन आपल्या प्रयोगशाळांतील कोरोनाचे नमुने नष्ट करीत असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. चीनने मात्र त्याचा स्पष्टपणे इन्कार केला होता. मात्र त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. एका इंग्रजी साप्ताहिकाने ही माहिती उघड केली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर रुग्णांचे जे नमुने घेण्यात आले होते. ते नष्ट करण्यात आले आहेत. बीजिंग येथे पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. जैविक प्रयोगशाळांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये. तसेच हा भयानक विषाणू देशाला आणखी संकटात लोटू नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा खुलासा त्यांनी केला. देशातील सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार हा निर्णय घेेण्यात आला आहे. ही कृती अत्यंत कायदेशीर आणि व्यवहार्य असल्याचा दावा त्यांनी केला.
चीनमध्ये झपाट्याने कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती जगापासून लपविण्यासाठी कोरोनाचे विषाणू नष्ट केल्याचा आरोप झाला आहे. या आरोपाचा यू डेंगफेंग यांनी इन्कार केला. कोरोनाची माहिती इतर देशांपासून लपविण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. जैविक सुरक्षा ही एकमेव चिंता त्यामागे होती, असे त्यांनी सांगितले. वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला अगदी तेव्हापासून आमचे शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेऊन होते आणि त्याच्या कारणांचा शोध घेत होते, असे डेंगफेंग यांनी म्हटले आहे.
चीन कोरोनाच्या प्रसाराबाबतची माहिती लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी केला होता. चीनचा कम्युनिष्ट पक्ष सत्य लपवित आहे. कोरोनाचा फैलाव कशा पध्दतीने होत आहे याची माहितीही त्यांनी जगाला कळू दिली नाही, असा त्यांचा आक्षेप होता. इतरांना सोडाच पण जागतिक आरोग्य संघटनेलाही त्यांनी यातील काहीही कळू दिले नव्हते असा दावाही अमेरिकेने केला आहे.
चीन-अमेरिका संबंधांत आणखी कटुता
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधात कोरोनामुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यातच चीनने कोरोना विषाणूचे नमुने नष्ट केल्याची माहिती समोर आल्याने तणावात आणखी भर पडली आहे. कोरोनाचे विषाणू वुहान प्रयोगश़ाळेतून बाहेर पडले आहेत, असाही अमेरिकेचा आरोप आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अनेकदा जाहीरपणे चीनवर आरोप केला होता. कोरोना विषाणूचा उल्लेख त्यांनी चायनीज व्हायरस असा केला होता.
अमेरिकेचा आरोप असा
चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव सर्वप्रथम डिसेंबरमध्ये झाला. या साथीची सुरुवात होताच पहिल्या काही रुग्णांचे नमुने चीनने घेतले. अमेरिकेसह इतर देशात या साथीचा फैलाव होऊ लागताच चीनकडे विषाणूंचे नमुने मागण्यात आले. त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शविला. चीन हे विषाणू नष्ट करीत असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांनी त्याचा वारंवार इन्कार केला. मात्र स्वत: चीनने हे विषाणू नष्ट केल्याची कबुली दिली आहे.