महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ फेब्रुवारी । पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात ईडीने 10 ठिकाणी शोध मोहीम राबवली. यावेळी त्यांच्या घरातून तब्बल 2.72 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 41 लाख रुपयांची रोकड, 4 हाय एंड कार, डिजिटल उपकरणे आणि विविध गुन्हे दाखले असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ईडीने दिली आहे. ही कारवाई 27 जानेवारी रोजी करण्यात आली.
छापे टाकल्यानंतर मूलचंदानी यांनी तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे.
अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. पिंपरी मधील मिस्ट्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचे वाटप केल्याचेआणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pune News) याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला होता. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यावधीचा पैसा अडकून आहे.