महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – सातारा – विशेष प्रतिनिधी – सुनील आढाव – : पोलीस व प्रशासन त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावत असताना नाहक त्यांच्या समोरून जाऊन सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडवत बेफिकीरी करणाऱ्या महाभागांना आवरण्याची वेळ आली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारी व राष्ट्रीय आपत्तीत लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळ वडूथ, साताराचे अध्यक्ष तथा नमो नमो मोर्चा (भारत) साताऱ्याचे जिल्हा अध्यक्ष मदन भिमाजी साबळे यांनी केली आहे.
सातारा तालुक्यातील वडूथ हे मुख्यबाजारपेठेचे गाव आहे. या ठिकाणी परिसरातील सुमारे 15 गावातील रहिवाशांची रहदारी अद्यापही सुरूच आहे. त्यातच दुकानदार, व्यापारीवर्गाकडूनही कोणत्याच प्रकारची शिस्त अथवा सोशल डिस्टंन्सिंगची काळजी घेतली जात नाही.
खुप दिवस झाले की आपण लोकांसमोर दिसायला हवे या उद्देशाने तर काही महाभाग स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठीचे केविलवाणे प्रयत्न करत असतात. अशांना कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीचा विसर पडलेला दिसतो आहे. कारण लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका अशा जिल्हाधिकार्यांच्या सक्त सुचना असताना सुद्धा हे महाभाग पोलीस व प्रशासनाशी जवळीक साधून लॉकडाऊनचे नियम मोडत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले फोटो पाहून अनेकांनाही चौकाचौकांत जाण्याचा मोह बळावत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे थांबणे खुपच गरजेचे आहे.
शासनाने लॉकडाऊनअंतर्गत जनतेसाठी काही नियम घालून दिले आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सूट दिली आहे. किराणा, भाजी, औषधालये सुरू ठेवण्यात आली आहेत. रेशन दुकानेही सुरू आहेत. गोरगरीबांसाठी स्वयंसेवी संस्थांनाही सूट आहे. सामान्य जनतेची कोंडी होऊ नये म्हणून शासनातर्पेâ लॉकडाऊनमध्ये वावरताना प्रत्येकाने सोशल डिस्टंन्सिगचे पालन करावे ही अपेक्षा गृहीत धरली पाहीजे. रस्त्यांवर अथवा चौकात किंवा ठरवून दिलेल्या जागेत भाजीबाजार भरतो. भाजीबाजारात लोक गर्दी करीत आहेत. भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे अजिबात पालन होत नसल्याचे दिसून येते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने पोलिसांची गस्त वाढली आहे. पोलिसांची गाडी आली की लोक गायब होतात. मात्र लगेच कुठूनतरी बिळातून हे महाभाग बाहेर पडतात व बेफिकीरीपणे माकडचाळे करत असताना पहायला मिळते. अशा महाभागांवर गुन्हे दाखल करावेत तरच कुठेतरी त्यांना शिस्त येईल, असे मदन साबळे यांनी म्हटले आहे.