महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।४ फेब्रुवारी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोमवारपासून (६ फेब्रुवारी) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांनी संबंधित हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची असून, हॉल तिकीटसाठी कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.
राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर शाळा लॉगिनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाईल. हॉल तिकीट डाऊनलोड करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. हॉल तिकीटात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळांनीविभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. हॉल तिकीटावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे.
हॉल तिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.