महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ फेब्रुवारी । पुणे, पिंपरी-चिंचवडचे उद्योजक नाना गायकवाड यांच्यावर कारागृहात हल्ला झाला आहे. गायकवाड सध्या येरवडा कारागृहात मोकाअंतर्गत शिक्षा भोगत आहेत. सोलापूरमधल्या एका आरोपीने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
नाना गायकवाड मोकामधील आरोपी आहे आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्यावर आज येरवडा कारागृहात एका कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला. सोलापूरच्या गँगवार मधील देवा या नावाच्या आरोपीने नाना गायकवाड याच्यावर हा हल्ला केल्याचे समजत आहे.
नेमकं या दोघांमध्ये काय वाद झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नाना गायकवाड येरवडा कारागृहात आहे. बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर मोका अंतर्गत देखील कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावर 2021 मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे तसेच जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर बेनामी जमीन बळकवल्याचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे 100 कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती सापडली होती.