महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली असून या आजारामुळे ग्रस्त रुग्णांच्या संख्येने आता 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 101139 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असतानाच मृतांचाही आकडा वाढतो आहे. मंगळवारी सकाळपर्यंत देशात या आजारामुळे 3163 जण दगावले होते. आरोग्यमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा 4970 ने वाढला होता.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 58802 इतकी आहे. 39173 जण या आजारातून बरे झाले आहेत. तर या आजारामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे. नियमानुसार आजारी, बरे झालेले आणि मृत्यूमुखी पडलेले असा तिघांचा आकडा मिळून आकडा सांगितला जातो. त्यानुसार हिंदुस्थानात हा आकडा 101139 इतका झाला आहे.
COVID19 cases cross 1 lakh mark with a single-day jump of 4970 cases & 134 deaths; total cases 101139 & death toll 3163: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/i16FULqLjn
— ANI (@ANI) May 19, 2020
जगभरात फक्त 10 देश असे आहेत ज्यांच्या देशात कोरोनाचे रुग्ण 1 लाखांपेक्षा जास्त आहेत. हिंदुस्थानही आता या यादीत समाविष्ट झाला आहे. सध्याच्या घडीला हिंदुस्थान हा सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या देशांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या ही 15 लाख झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर रशिया असून तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या 2.90 लाख इतकी आहे. या यादीत स्पेन तिसऱ्या क्रमांकावर असून तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या 2.45 लाख इतकी झाली आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. सध्या जगभरात 48 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त असल्याचे वृत्त आहे. यातल्या 3 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.
25 मार्चपासून देशातील लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली होती सध्या लॉकडाऊन-4 सुरू असून कोरोनाचा फैलाव रोकण्यात अद्याप यश आलेलं नाहीये. हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखाच्या पलिकडे पोहोचला आहे. कोरोना फैलावू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून तो तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. असं असलं तरी कोरोनाला आळा घालण्यात अद्याप यश मिळालेलं नाहीये. अवघ्या 12 दिवसांत देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतं आहे .