महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । राज्यात सात महिन्यांपूर्वी नवीन सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे मिंधे गटातील आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आमदारांनी याबद्दलची खदखद वारंवार बोलून देखील दाखविली आहे. अनेक आमदार विस्ताराकडे डोळे लावून आहेत. भाजप आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप स्वतः मिंधे गटातील आमदार करत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणखी किती काळ राहील याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
आमदारांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची धाकधूक वाढलेली असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? याचं नेमकं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ज्या पोटनिवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढली, त्या ठिकाणी भाजपचा धुव्वा उडालेला आहे. त्यामुळे आता आपलं सरकार टिकेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे शिंदे सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. यामुळे त्यांच्या रोज दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होतंय. त्यात प्रशासकीय कारभाराबद्दल न बोललेलच बरं.