रेशनकार्डातील 34 लाख नावे कमी ; राज्यात 63 हजार रेशन कार्ड झाली कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । राज्यात रेशनकार्डमधील आतापर्यंत तब्बल 34 लाख नावे कमी झाली आहेत. राज्यात आधार सीडिंग मोहीम सुरू आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. कमी झालेल्या नावांमुळे आता राज्यातील प्राधान्य कुटुंब योजनेच्या धान्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नव्या 34 लाख लोकांना मोफत धान्याचा लाभ देता येणे शक्य आहे.

राज्यात दि. 1 सप्टेंबर 2022 पासून आधार सीडिंगची मोहीम सुरू करण्यात आली. रेशनकार्डवर जितकी नावे आहेत, त्या सर्वांचे आधारकार्ड रेशनकार्डशी या मोहिमेत जोडण्यात येत आहे. राज्यात पुणे विभागात आधारसिडिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागातही हे काम 95 टक्क्यांपासून ते 99 टक्क्यापर्यंत होत आले आहे.

राज्यात दि.2 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांत 34 लाख 8 हजार जणांची नावे कमी झाली आहेत. नावे कमी झालेल्यांचे धान्य बंद झाले आहे. तरीही त्याबाबत तक्रारी झालेल्या नाही. यामुळे कमी झालेली बहुतांशी सर्व नावे मृत्यू, विवाह आणि स्थलांतरित या कारणांनी कमी झाल्याचे स्पष्ट आहे. ज्या नावांबाबत तक्रारी आल्या, त्याची खातरजमा करून ती समाविष्ट करण्यात येत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण राज्यात अत्यल्प आहे.

राज्यात 63 हजार रेशन कार्ड झाली कमी
या आकडेवारी नूसार राज्यात एकूण 63 हजार 373 रेशनकार्ड कमी झाली आहेत. काही जिल्ह्यात नावे कमी झाली असली तरी रेशनकार्डची संख्या विभाजनामुळे वाढली आहे.

म्हणून नावे कमी होऊनही तक्रार नाही
रेशनकार्डात जितकी लाभार्थ्यांची संख्या (युनिट) तितके धान्य मिळते. यामुळे मृत्यूनंतर वर्षानुवर्षे रेशनकार्डातील त्या व्यक्तीचे नावे कमी केले जात नाही, विवाहानंतर मुलगीला सासरच्या रेशनकार्डातील नावाची गरज निर्माण होईपर्यंत माहेरच्या रेशनकार्डातील नाव कमी केले जात नव्हती.आधारसीडिंगमुळे ही नावे कमी झाली, तसेच एकापेक्षा जादा ठिकाणी असलेली कार्डेही कमी झाली. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नावे कमी होऊनही तक्रारी आलेल्या नाहीत.

दरमहा 17 हजार मेट्रिक टन धान्याची बचत
रेशनकार्डवरील नावे कमी केली आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना प्रति महिना पाच किलो मिळणारे धान्य बंद झाले आहे. त्यातून राज्यात प्रत्येक महिन्याला सुमारे 17 हजार मेट्रिक टन धान्याची बचत होणार आहे.

नवे 34 लाख लाभार्थी शक्य
बचत होणारे धान्य नव्या 34 लाख नागरिकांना देता येणे शक्य आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या रेशनकार्डवर अद्याप त्यांच्या कुटुंबातील अपत्ये, सून, नातवंडे आदी ज्यांच्या नावाची नोंद झालेली नाही, त्यांची प्रथम नोंद करून नंतर उरलेल्या इष्टांकानुसार अन्य कार्डधारकांचा योजनेत समावेश करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

पुणे विभागात सर्वाधिक, कोकणात सर्वात कमी
पुणे विभागातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे शहर व जिल्ह्यातील सर्वाधिक 11 लाख 18 हजार 871 नावे आजअखेर कमी झाली आहेत. यासह 78 हजार 385 रेशनकार्ड कमी झाली आहेत. सर्वात कमी नावे ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण विभागातील कमी झाली आहेत. कोकण विभागातून केवळ 48 हजार 721 नावे कमी झाली आहेत. कोकण विभागात रेशनकार्डांची संख्या मात्र, वाढली आहे.

अकोला, सिंधुदुर्ग, गडचिरोलीत सदस्य संख्या वाढली आहे. ठाणे ई-विभाग (शहर) मधून 4 लाख 11 हजार 423 इतकी सर्वाधिक नावे कमी झाली आहेत.

कोल्हापुरात १ लाख ८१ हजार नावे कमी
कोल्हापूर जिल्ह्यातील रेशनकार्डमधून १ लाख ८१ हजार नावे कमी झाली आहेत. मात्र, जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत रेशनकार्डची संख्या ३ हजार ७२९ ने वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *