Maharashtra Weather Cold Wave : राज्यात 5 अंशांनी पारा घसरला, पुण्यासह या ठिकाणी येणार थंडीची लाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहरात अचानक पारा घसरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगाव, पुणे शहराच्या तापमानात अचानक घट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील तापमान 10.3 अंशांवर आले आहे. तर विदर्भाच्या काही भागांत तुरळक ठिकाणी थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ही थंडी पुढची 8 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हिमालयीन भागासह जम्मू आणि काश्मीर भागात पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वाढला आहे. त्यामुळे या भागात हिमवर्षाव, तर उत्तर भारतात तीव्र थंडी आणि दाट धुके वाढले आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळेच राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. जळगाव गारठले असून शहराचे किमान तापमान 7.7 अंश एवढे घसरले आहे.

मागच्या 24 तासांत जळगाव येथे राज्यातील नीचांकी 7.7 अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात पारा 10 अंशांच्या खाली घसरल्याने तसेच किमान तापमानात 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने पुणे, जळगावसह नागपूर येथे थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

याबरोबर धुळे, निफाड, मराठवाड्यातील औरंगाबाद येथे तापमानात १० अंशांपर्यंत खाली घसरले आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात घट कायम आहे. कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाली असून, रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण श्रीलंकेतील तीव्र कमी दाब पट्ट्याची तिव्रता कमी झाली असून, श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या कोमोरीन भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. 04) राजस्थानच्या उमरिया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 5.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.05) पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *