तुर्की -सीरियात भूकंपाचे 3 मोठे धक्के:4,300 हून अधिक मृत्यू, शेकडो ढिगाऱ्यात अडकले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ फेब्रुवारी । मध्यपूर्वेतील चार देश तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. या ठिकाणी 12 तासांमध्ये मोठे भूकंप झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्कस्तान आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक विध्वंस पाहायला दिसून येत आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार – तुर्कीये आणि सीरियामध्ये आतापर्यंत 4,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु येथे कोणतेही नुकसान झाले नाही. तुर्कस्तानमध्ये आतापर्यंत 2921 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. येथील सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्याचवेळी, सीरियामध्ये 1,444 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजारांहून अधिक जखमी आहेत.

तुर्की मीडियानुसार – 3 मोठे भूकंप
तुर्कीये वेळेनुसार पहिला, सकाळी 4 च्या सुमारास (7.8) आणि दुसरा सुमारे 10 (7.6) आणि तिसरा दुपारी 3 वाजता (6.0). याशिवाय 78 आफ्टरशॉकची नोंद झाली आहे. त्याची तीव्रता 4 ते 5 इतकी होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानचे गझियानटेप शहर
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. त्याचा परिणामही दिसून येत आहे. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचं वृत्त आहे. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमधील भूकंपात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, 140 कोटी भारतीयांच्या भावना तुर्कीसोबत आहेत. भारत सरकार मदतीसाठी मदत सामग्रीसह NDRF च्या शोध आणि बचाव पथके आणि वैद्यकीय पथके तुर्कीला पाठवत आहेत.

युरोपीय संघासोबतच भारतही तुर्कस्तानला मदत पाठवणार आहे. भारत सरकारने सांगितले- NDRF च्या 2 टीम ज्यात 100 कर्मचारी आहेत ज्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत.
इस्रायल, अझरबैजान, रोमानिया, नेदरलँड्सही बचावकार्यासाठी पथके पाठवत आहेत.
तुर्कस्तानमध्ये भूकंपग्रस्त भागात रक्तदान शिबिरे सुरू करण्यात आली आहेत.
रशियानेही तुर्की आणि सीरियाला मदत पाठवण्याची घोषणा केली आहे. पुतिन सध्या 100 बचाव कर्मचार्‍यांसह दोन इलुशिन-76 विमाने पाठवण्याच्या तयारीत आहेत.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनही मदत पाठवण्यास तयार आहेत.
या शहरांमध्ये सर्वाधिक विध्वंस
अंकारा, गझियानटेप, कहरामनमारस, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी यासह 10 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. येथे 1,710 हून अधिक इमारती कोसळल्याची सांगितले जात आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अनेक भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालये आठवडाभर बंद राहणार
तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, देशातील 10 शहरांमध्ये इमर्जन्सी आणि रेड अलर्ट कायम राहणार आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. सध्या 200 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लष्करासाठी आम्ही एअर कॉरिडॉर बनवत आहोत. यामध्ये फक्त विमानांना लँडिंग आणि टेकऑफ करण्याची परवानगी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *