वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका, नवा रस्ता तयार केला जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ फेब्रुवारी । पुणे । गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत बैठक घेतली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यावेळी उपस्थित होते.

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती. या कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता आहे. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा, अशी सूचना बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी केली. तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे, पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *