वरळीत होणार ठाकरे Vs ठाकरे सामना ? एकनाथ शिंदे हुकमी अस्त्र बाहेर काढणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ फेब्रुवारी । माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरला असतानाच आणखी एका कारणामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढण्यासाठी त्यांचे चुलत बंधू निहार ठाकरे यांना उतरविण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे सध्या चाचपणी सुरू असल्याचे समजते. खरोखरीच अशी लढत झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले होते. ‘हिंमत असेल; तर मुख्यमंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. लोकांमध्ये उतरून निवडणूक लढवून दाखवा,’ असे वक्तव्य आदित्य यांनी केले होते. ‘तुम्ही ठाण्यात लढणार असाल तर मी ठाण्यात येतो; अन्यथा माझ्या वरळी मतदारसंघात माझ्याविरुद्ध लढून दाखवा,’ असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निहार ठाकरे यांना रिंगणात उतरविण्याबाबत विचार सुरू केल्याचे समजते.

बंडानंतर दिले वकिली बळ

निहार हे उद्धव ठाकरे यांचे सर्वांत मोठे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. निहार ठाकरे व्यवसायाने वकील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत ते सल्ला देण्याची भूमिका पार पाडत आहेत. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचा सत्तासंघर्ष सुरू असून, त्यासाठी शिंदे यांच्या पक्षाने जी मध्यवर्ती समिती नेमली आहे, त्यात निहार ठाकरे यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी लगेचच शिंदे यांच्या बाजूने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याने माझा त्यांना पाठिंबा असल्याचे ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *