महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । 10 फेब्रुवारी । चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून आज गुरुवारी (ता. ९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु; त्यास यश आले नाही. त्यामुळे कलाटे निवडणूक लढविण्याबाबत आजपर्यंत ठाम होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना माघार घेण्याबाबत बोलणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. कलाटे यांनी माघार न घेतल्यास प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
पक्षाचे निरिक्षक, आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्याशी अजित पवार यांनी बोलावे, अशी त्यांना विनंती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी रात्री किंवा उद्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी कलाटे यांच्याशी माघार घेण्याबाबत बोलणार आहेत,
अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांनी दिली. तर; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर उद्या सकाळी १० वाजता कलाटे यांच्याशी शहरात येवून बोलणार आहेत. यावेळी अहिर माघार घेण्यासाठी कलाटे यांची पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मोबाईलद्वारे चर्चा घडवून आणू शकतात.
अजित पवार यांनी घेतली आढावा बैठक
अजित पवार यांनी आज गुरुवारी (ता. ९) माजी नगरेसवक मोरेश्वर भोंडवे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी प्रचाराबाबत चर्चा केली. तसेच; शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही प्रचाराबाबत नियोजन केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, अनंत कोऱ्हाळे, सतोष पवार आदि उपस्थित होते.
राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरुन चर्चा सुरु आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख सचिन अहिर उद्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वाजता बोलणार आहेत.
– सचिन भोसले, शहर प्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.