महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० फेब्रुवारी । : राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी कलाटे यांच्याशी चर्चा केली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. त्यानंतरही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन तास बाकी असून कलाटे यांनी अद्यापही कोणताही निर्णय न घेतल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कलाटे यांच्याशी काल फोनवरून संवाद साधला होता. त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनीही अर्ज मागे घेण्याची कलाटे यांना विनंती केली. मात्र, कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले.
त्यामुळे आमदार सचिन अहिर मुंबईहून थेट चिंचवडला पोहोचले. त्यांनी तब्बल अर्धा तास कलाटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चाही करून दिली. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही.