महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ फेब्रुवारी । 13 फेब्रुवारी 2010 हा दिवस पुणेकर कधीही विसरु शकणार नाहीत. या दिवशी दिलेल्या जखमा आजही पुणेकरांसह देशवासियांच्या मनात घर करुन आहेत. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील नामवंत बेकरीत नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती. कॉलेज मधील तरुण, तरुणींचे ग्रुप, विदेशी पर्यटक आणि फिरायला बाहेर पडलेले पुणेकर असं जगबजलेलं वातावरणं होतं. सगळं रोजच्या सारखं सुरु होतं. काही क्षणातच सगळं चित्र बदलेल असं कोणालाही वाटलंच नव्हतं. तेवढ्यातच एका बेवारस पिशवीने घात केला. जर्मन बेकरीत अचानक मोठा स्फोट झाला.या बॉम्ब स्फोटाला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत.
13 वर्षापूर्वी जर्मन बेकरी परिसरात संध्याकाळी सातच्या सुमारास आरडाओरड सुरु झाली. किंकाळ्या उठल्या. लोक सैरावैरा धावत सुटले होते. हसत खेळत असणाऱ्या लोकांचा जोरात आरडाओरड सुरु झाली. या बेकरीत माणसांचे मृतदेह सगळीकडे विखुरले होते. काहींचा जीव वाचला मात्र काहींची शरीरं अंगभर जखमांनी भरली होती. हे दृश्य भीतीदायक होतं. सुरुवातील साध्या सिलेंडरचा स्फोट झाला असं अनेकांना वाटलं मात्र हा साधासुधा स्फोट नसून तो दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली स्फोट होता. हे सगळं पाहून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते स्वत:हून पूढे येत जमेल तशी मदत करत होते आणि बचावकार्य राबवत होते. त्यावेळी जे लोक तिथे उपस्थित होते त्यांच्या डोळ्यासमोर हे दृष्य आजही ताजं असेल आणि त्या दृष्यानं त्यांच्या अंगावर आजही शहारे उठत असतील. अनेकांचे हात तुटले होते अनेकांचे पाय तुटले होते.
या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. त्यात पाच विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यातले दोघे पुण्यातले होते. 56 नागरिक या स्फोटात जखमी झाले होते. या जखमींमध्ये 10 विदेशी होते. या जखमींना पुण्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यादिवशी या परिसरात आणीबाणीची परिस्थिती होती. पुण्यातल्या जर्मन बेकरीचं नाव एकाच क्षणात वेगळ्याचं कारणाने जगभरात पोहचलं होतं. पुण्यात यापूर्वी दोन किरकोळ स्फोट घडवण्यात आले होते. दहशतवाद्यांना अटकही झाली होती. मात्र त्यात फारसे नुकसान झालं नव्हतं. यानंतर नेहमीप्रमाणे अनेक नेते मंडळींनी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यांनी हादरलेल्या अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. जर्मन बेकरीवर झालेला हल्ला का केवळ एका कॅफेवर झालेला हल्ला नव्हता तर देशावर झालेला हल्ला होता.