महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरूवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर शिंदे गटातून जल्लोष केला जात आहे. दरम्यान, आता ठाकरे गटासमोर एक मोठा पेच उभा राहिला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह उरलेले १५ आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. (Latest Marathi News)
येत्या विधीमंडळ अधिवेशात आदित्य ठाकरे यांच्यासह या सर्व १५ आमदारांना प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. इतकंच नाही तर, मांडलेल्या विधेयकांवर त्यांच्या बाजूने मतदान देखील करावं लागणार आहे, असं नाही केल्यास आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे हे उरलेल्या १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. (Political News)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर असलेल्या १५ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हचं हाती घेतल्यानंतर येत्या विधीमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे गटातील १५ आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. महत्वाचं म्हणजे यामध्ये सुप्रीम कोर्टही विधानसभा अध्यक्षांना रोखू शकत नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आता ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकारपरिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. येत्या 21 फेब्रुवारीपासून न्यायालयात नियमीत सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी मागणी आम्ही केली होती. तरी देखील निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पवारांचा ‘तो’ सल्ला ठाकरे ऐकणार?
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राज्यभरातील नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं असून उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहेत त्यावर चर्चा करता येणार नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालाने ठाकरे गटाला फारसा फरक पडणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.