महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । शुक्रवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानं शिंदे गटात उत्साहाच वातावरण आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिदे गटाने आपला मोर्चा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे वळवल्याचं दिसून येत आहे. राज्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदे गटात दिसतील असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
राज्यात राजकीय भूकंप होईल असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलले होते. त्यावर उत्तर देताना खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले की राजकीय भूकंप नक्की होईल, मात्र तो असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे गट आणि भाजपमध्ये सामील झालेले दिसतील. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.