महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० फेब्रुवारी । अर्थसंकल्पामध्ये ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा जोरदार विरोध दर्शवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदांसह सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हा व्हीप पाळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचे प्रतोद भारत गोगावले यांनी व्हीप जारी केला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे. तर व्हिप झुगारल्यास निलंबन होणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर बैठकीनंतर निर्णय होणार असून याबाबत आमचे खासदार ठरवतील, असंही भारत गोगावले म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आमदार अजिबात अपात्र होऊ शकत नाही. कारण दोन गटांना मान्यता दिल्यानंतर दोन्ही गट आहेत हे मान्य केले आहे आणि दोन्ही गटांना नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने त्या गटाला नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे आमच्या गटाचा आणि त्या गटाचा संबंध नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.