महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात एकूण आठ लाख 44 हजार 623 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात रविवारी (दि.26) मतदान होणार असून, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये 5 लाख 68 हजार 954 इतकी मतदारांची संख्या असून, त्यात 3 लाख 2 हजार 946 पुरुष, 2 लाख 65 हजार 974 स्त्री, तर 34 तृतीयपंथी मतदार आहेत.
कसबा पेठ मतदारसंघामध्ये 2 लाख 75 हजार 679 इतकी एकूण मतदारांची संख्या असून, त्यापैकी 1 लाख 36 हजार 984 पुरुष, 1 लाख 38 हजार 690 स्त्री व 5 तृतीयपंथी मतदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 510, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये 270 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 13, तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये 9 मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित केली आहेत. दोन्ही मतदारसंघांत एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केली जाणार आहे.