महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ फेब्रुवारी । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेला पैलवान सिकंदर शेख याने आता पंजाबचा भारत केसरी पै. गुरुप्रीत सिंगला पराभवाची धूळ चारली आहे. विजयी झालेल्या सिकंदर शेख याला कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे अडीच लाखांच्या पारितोषिकासह छत्रपती केसरीचा बहुमान प्रदान करण्यात आला.
ट्रबल शुटिंग सोशल वेलफेअर फौंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त कृष्णाकाठावरील सरकारी घाट परिसरात कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत लहान मोठ्या अश्या शंभर कुस्ती पारपडल्या. यात कोल्हापूरच्या गंगावेस तालमीतील पैलवान सिकंदर शेख याचा सामना पंजाबचा भारत केसरी पै. गुरुप्रीत सिंग याच्यासोबत झाला. सामना सुरु झाल्यानंतर सिकंदरने काही क्षणातच आपल्या कौशल्याने गुरुप्रीत सिंग याचा पराभव केला. गुरुप्रीतवर एकचाक डावावर मात करीत सिकंदरने दर्शकांना आश्चर्य चकित केले.
कोल्हापूरचा सिकंदर शेख हा पैलवान पुण्यात पारपडलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अधिक चर्चेत आला होता. मातीतील कुस्तीच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडकडून सिकंदर शेखचा पराभव पत्करावा लागला. परंतु या सामन्यात पंचांनी महेंद्र याला अधिकचे गुण दिल्यामुळे सिकंदर शेखने आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता. परंतु पंचानी तसेच महाराष्ट्र केसरीच्या आयोजकांनी हा आरोप फेटाळला.