कोरोनानंतरच्या 3 वर्षांमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 10.67% घट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ मार्च । यंदा राज्यभरातील १५ लाख, ७७ हजार, २५६ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा २५ मार्चपर्यंत सुरू राहील. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ६१ हजार ७०८ इतकी म्हणजेच ३.७६ टक्के घट झाली आहे. मात्र कोरोनानंतर राज्य मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सन २०२० च्या तुलनेत तीन वर्षात म्हणजे सन २०२३ पर्यंत १०.६७ टक्के एवढी मोठी घट झाली आहे. यंदा दहावी परीक्षा देणाऱ्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनी आहेत. तसेच ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. राज्यातील २३ हजार १० शाळांतून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यात एकूण ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. कोरोनाकाळात ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली होती यावर्षी मात्र परीक्षा पारंपरिक पद्धतीने होईल आणि १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल अशी माहिती राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक तसेच माणिक ठकार यावेळी उपस्थित होते.

सीबीएसई, आयसीएसई शाळा वाढल्या
^यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या राज्य बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येतील घट लक्षणीय आहे. यामागील कारणे शोधू पाहता, गेल्या चार -पाच वर्षापासून राज्यातील सीबीएसई, विद्यार्थी संख्येतील शाळा व अभ्यासक्रमात मोठी वाढ झाली आहे. दुसरे कारण म्हणजे राज्यात गेल्या दहा वर्षांपासून नव्या मराठी शाळांना शासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. शाळाच नसतील तर विद्यार्थी कुठून येणार, असा प्रश्न आहे. तिसरे कारण म्हणजे, राज्यातील शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. काही प्रमाणात कोरोना संकटाचा परिणामही असू शकेल. – डाॅ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

अशी आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची कारणे
राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होण्यामागे इतर बोर्डांकडे वळलेले विद्यार्थी, बहिःस्थ पद्धतीने परीक्षा देणारे विद्यार्थी, एक कुटुंब, एक मूल याचा प्रभाव आणि कोरोना संकट अशी काही कारणे विद्यार्थ्यांची संख्या घटण्यामागे आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *