Weather Forecast : आज महाराष्ट्रासह ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । देशात गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अनेक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. देशात कुठे ऊन, तर कुठे पाऊस पाहायला मिळत आहे. होळी आधी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. इतकंच नाही होळीनंतरही हवामानात बदल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) याबाबत माहिती दिली आहे.

कुठे ऊन, तर कुठे पाऊस
देशाच्या राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी हलक्या पावसच्या सरी येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तसेच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 8 मार्च दरम्यान, मध्य आणि पश्चिम भारतात वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या पाच दिवसात कसं असेल वातावरण?
महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता असून त्यानंतर 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या 15 दिवसांत देशाच्या इतर भागांतील कमाल तापमानावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. दिल्लीत हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

पश्चिमी वाऱ्यांचा हवामानावर परिणाम
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि त्याच्या जवळपासच्या भागात पश्चिमी वाऱ्यांचा अंशतः प्रभाव दिसणार आहे. यासोबतच दक्षिण कोकण आणि मध्य छत्तीसगडमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे 6 ते 8 मार्च रोजी मध्य भारतात हलका, मध्यम आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ भागात पावसाचा अंदाज
IMD नुसार, 6 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र, 6 ते 7 मार्च रोजी राजस्थान आणि गुजरातमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 6 ते 7 मार्च रोजी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे आणि पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, 7 मार्च रोजी पश्चिम राजस्थान, मराठवाडा आणि विदर्भात असेच हवामान राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *