![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सहा हजार ०५८ घरांसाठी मंगळवारी सोडत काढण्यात येणार होती. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक ही सोडत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. याचे कोणतेही कारण मंडळाने दिले नसून आता सोडत कधी होणार हेही स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून मंगळवारची (७ मार्च) वेळ मिळू न शकल्याने आणि पुढची तारीखही त्यांच्याकडून निश्चित न झाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. दरम्यान, सोडत अचानक रद्द केल्यामुळे अर्जदार प्रचंड नाराज झाले आहेत.
पुणे मंडळाच्या सहा हजार ०५८ घरांसाठीच्या सोडतपूर्व प्रक्रियेला जानेवारीत सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेनुसार १७ फेब्रुवारी रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने मधेच मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेला अर्थात अर्ज विक्री, स्वीकृतीला मुदतवाढ दिली. त्यानुसार १७ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारी सोडत ७ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या मुदतवाढीनुसार आता अर्ज विक्री, स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, सोमवार, ६ मार्च रोजी सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार होती. पण ही यादी प्रसिद्ध झाली नसून आता ही यादी ९ मार्च रोजी प्रसिद्ध होईल, अशी माहिती मंडळाने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. त्यापाठोपाठ ७ मार्च रोजी काढण्यात येणारी सोडत पुढे ढकलण्यात आल्याचेही त्यात नमुद करण्यात आले आहे.
सोडत पुढे ढकलून मंडळाने ५० हजार अर्जदारांची निराशा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सोडत का पुढे ढकलण्यात आली याचे कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. पुढची तारीख लवकरच कळवू असे नमूद करण्यात आले आहे. सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समाजमाध्यम वा प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. म्हाडाकडून यासंबंधीचे प्रसिद्धी पत्रकही जारी करण्यात आलेले नाही. एकूणच सोडत लांबणीवर गेल्याची माहितीच अर्जदारांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे मंगळवारी सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची निराशा झाली. सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे अनेकांना आज समजले. मंडळाच्या या कारभारावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.