Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

सतीश कौशिक यांनी अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात नाव कमावलं. पण, वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. सतीश कौशिक यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं होतं. छोट्या मुलाच्या निधनामुळे कौशिक यांना मोठा धक्का बसला होता.

सतीश कौशिक यांनी १९८५ साली शशी कौशिक यांच्याशी विवाह केला होता. १९९६ साली त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. कौशिक यांच्या दोन वर्षाच्या मुलाचं निधन झालं. या मोठ्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरलं होतं. त्यानंतर १६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. ५६व्या वर्षी ते पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे. त्यांची मुलगी फक्त ११ वर्षांची आहे.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *