पुणेकराना : पुढील दहा महिने रेल्वे प्रवाशांसाठी खडतर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९मार्च । पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची मागील अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. अखेर या कामास मुहूर्त मिळण्याचा चिन्हे आहेत. हे काम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. हे काम २८० दिवसांतू पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या नजीकच्या स्थानकांवरून सोडण्यात येणार आहेत. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे.

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मोठा असल्याने यासाठी सूक्ष्म पातळीपासून नियोजन करावे लागणार आहे. ठराविक मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करावा लागणार असल्याने त्याचे खूप दिवसांपासून नियोजन सुरू आहे. काम सुरू झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. त्यावेळी अनेक गाड्या नजीकच्या स्थानकांवरून सोडण्यात येणार आहेत.

यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. सध्या स्थानकातून सुटणाऱ्या, येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दैनंदिन गाड्यांची संख्या १५० आहे. यातील निम्म्या गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. या गाड्या इतर स्थानकावर वळवणे शक्य नाही. कारण नजीकच्या कोणत्याही स्थानकाची एवढी क्षमता नाही. त्यामुळे या गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरूनच सुरू राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

प्रवाशांची गैरसोय होणार
लोकल, इंटरसिटी आणि जवळच्या अंतरातील गाड्या हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे रिमॉडेलिंगच्या काळात प्रवाशांना पुणे स्थानकाऐवजी हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांवरून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे पुण्याच्या जवळच्या शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

यार्ड रिमॉडेलिंगचे भिजत घोंगडे
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली. स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी हा प्रकल्प घोषित करण्यात आला होता. लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबत रेल्वेच्या पुणे विभागाने केंद्रीय रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवला होता. नंतर करोना संकटामुळे या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर पाच वर्षांनी या प्रकल्पासाठी मुहूर्त उजाडला आहे.

नेमका प्रकल्प काय?
-सध्या पुणे रेल्वे स्थानकाची दैनंदिन १५० गाड्यांची क्षमता
-यार्ड रिमॉडेलिंगमध्ये रेल्वे स्थानकाची क्षमता वाढवणार
-यार्ड रिमॉडेलिंगमध्ये फलाटांची लांबी वाढवणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *