महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ मार्च । कसब्याची पोटनिवडणूक जिंकत भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणाऱ्या महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकरांनी गुरुवारी आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी सदनामध्ये जात असताना धंगेकर आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आमनेसामने आले होते. रवींद्र धंगेकर यांनी समोरून आलेल्या पाटील यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘हू इज धंगेकर’ अशी घोषणा दिली.
पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी who is Dhangekar? (धंगेकर कोण आहेत?) असा प्रश्न केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलतानाची त्यांची ती क्लिप व्हायरलही झाली होती. दरम्यान महाविकास आघाडीच्या धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत कसबा विधानसभा मतदारसंघासाठी झालेली पोटनिवडणूक जिंकली होती. महाविकास आघाडीच्या या विजयामुळे भाजपला आणि खासकरून चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का बसला होता. कसब्यातील विजयानंतर रविंद्र धंगेकर यांच्या अभिनंदनांचे होर्डिंग कसबा पेठ येथे झळकले होते. मात्र यातील एका होर्डिंग्जने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या होर्डिंग्जवर ‘This is Dhangekar’ असे लिहण्यात आले होते. हे होर्डिंग्ज चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याचे उत्तर असून त्यांना डिवचण्यासाठीच ते लावण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली होती. कोल्हापुरातील कावळा नाका येथील ताराराणी चौकात देखील हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते.