महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० मार्च । राज्याचा अर्थसंकल्प काल (गुरुवारी) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यामध्ये जनतेसाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. अशात गरीब कुटुंबातील मुलींसाठी सरकारनं ‘लेक लाडकी’ ही योजना आणली आहे. गरीब कुटुंबातील मुलींना व्यवस्थित शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेत किती आर्थिक लाभ मिळणार?
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुलींचे सक्षमीकरण व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुलगी १८ वर्षांची पूर्ण झाल्यावर तिला ७५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर रोख ५००० रुपये देण्यात येणार आहेत. मुलगी इयत्ता चौथीमध्ये गेल्यावर ४००० रुपये तर मुलगी इयत्ता ६वीत गेल्यावर ६००० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच अकरावीमध्ये गेल्यावर त्या मुलीला ११ हजार रुपये देण्यात येणार असून वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर मुलीला ७५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
एसटी प्रवासात मुभा
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिलांना तिकीट दरात ५० टक्के सुट देण्यात आली आहे. तसेच घर खरेदीसाठी महिलांना १ टक्का सवलत देण्यात आली आहे. यासह पुरुष खरेदीदाराला महिला घर विक्री करू शकते. ही सवलत देखील देण्यात आली आहे. या आधी १५ वर्षांपर्यंत महिलांना पुरुष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नव्हती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.