महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० मार्च । माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याभोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आणखी घट्ट होत चालला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील जवळपास १५ ठिकाणांवर छापे मारले. हे छापे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी मारले आहेत. याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. (Latest News)
ईडीचे छापे कुठे?
ईडीने दिल्लीत फ्रेंड्स कॉलनीत तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानीही छापा मारला आहे.
पाटण्यात राजदचे माजी आमदार अबु दोजाना यांच्या घरावरही धाड टाकली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही झडती घेण्यासाठी ईडीचे पथक पोहोचले आहे.
लालू यादव यांचे नातेवाइक जितेंद्र यादव यांच्या गाझियाबादस्थित घरीही ईडीने धाड टाकली आहे.
दोजाना यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सीए आरएस नाइक यांच्याशी संबंधित रांचीमधील ठिकाणांवरही धाडी टाकल्या आहेत.